जमाना बदलला असला तरी आपला संघर्षाचा काळ आठवणीत ठेवणाऱ्या त्या काळात आई-वडिलांनी आपल्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवणाऱ्या मुलांची काही उदाहरणं आपल्यासमोर अधूनमधून येत असतात. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील खोडा येथे राहून शिक्षण घेत यश मिळवून आज लाखोंच्या पॅकेजचं ऑफर लेटर मिळवणाऱ्या रोहिणी नावाच्या तरुणीची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे. खूप मेहनतीनंतर यशस्वी झालेल्या रोहिली मिश्रा हिला तिच्या बालपणीचे दिवस अजूनही आठवतात. जेव्हा तिने खूप शिकून घरची परिस्थिती बदलण्याचा स्वत:शीच निश्चय केला होता. आज तिने हा निश्चय खरा करून दाखवला.
रोहिणी मिश्रा या तरुणीची कहाणी खूप संघर्षाने भरलेली पण प्रेरणादायी अशीच आहे. गाझियाबादमधील खोडा परिसरात राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी कुटुंबांमध्ये इंद्रमोहन मिश्रा यांच्याही कुटुंबाचा समावेश होता. छोट्याशा भाड्याच्या खोलीत इंद्रमोहन मिश्रा त्यांची पत्नी सुषमा मिश्रा, मुलगी रोहिणी मिश्रा आणि मुलगा रोहित हे राहत होते. रोहिणी सांगते की, आमचं कुटुंब एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतं. पाचवीनंतर शिक्षण महाग झाल्याने मला आणि माझ्या भावाला वडिलांनी सरकारी शाळेत टाकले. तिथे शिक्षण सुरू असताना क्लासचा खूप लोड येत असे. पुढे नववीपर्यंत मी घरामध्ये खूप अभ्यास करून चांगले गुण मिळवले.
रोहिणी मिश्राने पुढे सांगितले की, सेक्टर ६२ मध्ये योगदा सत्संग सोसायटीशी संबंधित काही लोक मुलांना शिकवतात, असं मला समजलं. जेव्हा मी या आश्रमातील काही लोकांना भेटले तेव्हा आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन इंजिनियर बनता येतं, असं मला समजलं. तेव्हा मी जेईई आणि नंतर अॅडव्हान परीक्षा उत्तीर्ण करायची असा निश्चय मनाशी केला. इथून माझ्या अभ्यासात प्रगती सुरू झाली. दहावीत मी गौतमबुद्धनगरमधील सरकारी शाळांमधून पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. तेव्हा मला ८९ टक्के गुण मिळाले.
बारावीसोबत जेईईची तयारीही मी करत होते. त्यावेळी मी बारावीत ८४ टक्के गुण मिळवत जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेव्हा मी पहिल्या प्रयत्नात जेईई क्लिअर करू शकले नाही. त्यामुळे मी बारावीनंतर एक वर्ष ड्रॉप घेतला. तेव्हा एका नव्यानेच सुरू झालेल्या कोचिंग क्लासमध्ये सवलत मिळत होती. मी तिथूनच अभ्यास केला. माझ्या वडिलांनी लोकांकडून कर्ज घेऊन माझ्या कोचिंगचा खर्च भागवला. त्यानंतर मी ७४८३ रँकसह उत्तीर्ण झाले. त्यामुळे माझी आयआयटी खडकपूर येथे निवड झाली. आता माझ्या शिक्षणाची चार वर्षे संपत आहेत. येथूनच मला नोकरी मिळाली आहे. मला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून २१ लाख रुपयांची सीटीसी ऑफर झाली आहे, अशी माहिती रोहिणी हिने दिली.
आता अजून तीन ते चार महिन्यांचं शिक्षण बाकी आहे. त्यानंतर नोकरीला सुरुवात झाल्यावर मी सर्वप्रथम वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करेन. माझ्यासारखी अनेक मुलं विचार करतात की आयआयटीसाखं महागडं शिक्षण कसं घ्यायचं. माझ्या कुटुंबालासुद्धा १०-१२ लाख रुपयांचा खर्च झेपला नसला. त्यामुळे मी बँकेमधून कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केलं. मात्र मला शिष्यवृत्ती आणि मिळालेली असल्याने मला १२ लाख नाही तर सहा लाख रुपयेच द्यावे लागले आहेत. तर आता माझ्या भावाचीही हवाई दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे माझे आई वडील आनंदीत आहे. त्यांचा आनंद पाहून मीही समाधानी आहे, असेही रोहिणी मिश्रा हिने सांगितले.