सर्व सुखसोयी देऊन, काय हवे ते खायला प्यायला घालून अभ्यास करायला नको असे अनेकदा आपण ऐकतो किंवा आपल्या मुलांनाचा ऐकवतो. पण एका भाजी विक्रेत्याच्या लेकीने आई वडिलांसोबत भाजी विकायला बसून न्यायदेवतेचा तराजू हाती घेतला आहे. इंदौरच्या या पोरीने संघर्षमयी वातावरणात न्यायाधीश पद मिळविले आहे.
न्यायाधीश बनल्यानंतरही अंकिता नागर ही भाजीच्या ठेल्यावर जाऊन आई-वडिलांना मदत करत होती. न्यायाधीश बनण्यासाठी अंकिता वेळ मिळेल तसा अभ्यास करत होती. दोनदा अपयशही पदरी आले, तिसऱ्यांदा पोरीने आई-बापाचे नाव यशाच्या पाटीवर कोरले.
अंकिता सांगते की ती सतत आठ ते दहा तास अभ्यास करायची. अंकिताचे वडील पहाटे ५ वाजता उठून बाजारात जायचे, बाजारातून भाजी घेऊन येईपर्यंत अंकिता हातगाडीवर भाजी विकायची. आईवर घरीच आणि भाजीच्या ठेल्यावरची जबाबदारी असायची, तेव्हाही अंकिता तिला मदत करायची. दिवाणी न्यायाधीश झालेल्या अंकितानेही आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.
लग्नही केले नाही...
मुलीच्या यशाने संपूर्ण कुटुंब आनंदात आहे. अंकिताच्या आईच्याही डोळ्यात पाणी आले. आम्हाला आमच्या काळात चांगले शिक्षण मिळू शकले नाही पण आपल्या मुलीला शिकवण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण झाले, अशा शब्दांत अंकिताच्या आईने आनंद व्यक्त केला. अंकिताला एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण आहे. अंकिताने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्नही केलेले नाही. मोठा भाऊ आणि लहान बहिणीचे लग्न झाले आहे. मी निष्पक्ष आणि निर्भय राहून सर्वसामान्यांना मदत करेन आणि त्यांना न्याय मिळवून देईन, असे अंकिताने सांगितले.