यूपीएससी, कॅट आणि जेईई या परीक्षा सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जातात. यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणं देखील अनेकांसाठी अवघड असतं. आज आपण एका महिला IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी तिन्ही कठीण परीक्षा एकत्र उत्तीर्ण केल्या आहेत. IAS दिव्या मित्तल यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. ज्यांनी सर्वप्रथम JEE, नंतर CAT आणि शेवटी UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
दिव्या मित्तल या हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी आहेत. कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली. पण यावेळी त्यांना आयपीएस सेवा मिळाली, पण मित्तल यांना आयएएस सेवा हवी होती. अशा परिस्थितीत त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ऑल इंडिया ६८ रँकसह आयएएस झाल्या.
दिव्या मित्तल यांनी सुरुवातीपासूनच आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. आयआयटी दिल्लीतून बीटेक पदवी घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. आयआयटी दिल्लीनंतर त्यांनी कॅट परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयएम बंगलोरमधून एमबीए पदवी मिळवली. यानंतर एका चांगल्या जॉब पॅकेजसाठी लंडनला गेल्या.
दिव्या मित्तल यांच्या देशभक्तीने त्यांना भारतात परत आणलं आणि येथे आल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. मित्तल यांच्या आयएएस होण्यात त्यांचे पती आयएएस गगनदीप सिंह यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी दिव्या मित्तल यांना नागरी सेवांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा दिली.
अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या दिव्या मित्तल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणांनी मोबाईल फोनपासून दूर राहणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळात फोन हा तरुणांना सर्वात जास्त विचलित करणारा आहे. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
मित्तल यांना मसुरी येथील LBSNAA येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी अशोक बंबावाले पुरस्कार प्रदान करण्यात आला, जेथे नागरी सेवा अधिकाऱ्याचं ट्रेनिंग होतं. दिव्या मित्तल अभ्यास आणि कामाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर होत्या. मिर्झापूर येथे पोस्टिंग असताना त्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर जिल्ह्यातील हलिया ब्लॉकमधील लहुरियादह गावाला पाणीपुरवठा करण्याचा चमत्कार केला होता.