लखनौ, दि. 1 - राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळी प्रथेला विरोध करत बकरी ईदच्या दिवशी जनावरं नाही तर केक कापा, असे आवाहन मुस्लिमांना केले आहे. मुस्लिम उलेमा मात्र मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या या भूमिकेविरोधात उभी ठाकली आहे. 1400 वर्षांपासून बकरी ईदला जनावरांचा बळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, धर्मामध्ये आरएसएस हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदच्या दिवशी जनावरांचा बळी देण्याला विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.
जनावरांचा बळी देण्याऐवजी बक-याच्या आकाराचा केक कापा, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी मुस्लिम नागरिकांना करत आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक राजा रईस यांनी सांगितले की, बळी देणं इस्लाममध्ये गरजेचं नाही. पशू-पक्षी, झाडेझुडपे सर्व काही अल्लाहच्या दयेनं आहेत. बक-याच्या आकाराचा केक कापूनही बकरी ईद साजरी केली जाऊ शकते. तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली म्हणालेत की, ' बळी देण्याबाबत कुरानमध्ये सांगण्यात आले आहे. जनावरांचा बळी मंदिरामध्येही दिला जातो. त्यामुळे हा सल्ला केवळ मुस्लिमांनाच का दिला जात आहे?', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
यावर मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक राजा रईस यांनी सांगितले की, कुरानमध्ये असे लिहिलंय आहे की, जनावरांचे मांस तसंच रक्त खुदाकडे जाणार नाही. त्यामुळे खुदा बळी देण्याच्या विरोधात असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. रईस यांच्या विधानाचा विरोध करत मौलाना खालिद रशीद म्हणालेत की, आता ते म्हणतायेत कुरानमध्ये बकरी ईदला बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या म्हणतील कुरानमध्ये इस्लाम धर्माचा उल्लेखच नाही. कमीत कमी सणांच्या दिवशी तर शांतता राखा. तसंच सणाच्या दिवशी वाद निर्माण करणं कोणत्या तरी अजेंड्याचा भाग असू शकतो, असे सांगत मौलाना खालिद रशीद यांनी टीका केली आहे.
‘ते’ पोलीसही रडारवर! बकरी ईदसाठी विशेष दक्षता, व्यापा-यांना त्रास देणा-यांचे होणार तत्काळ निलंबन
मुंबई, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू व्यापारी व मुस्लीम बांधवांना कथित गोरक्षकांकडून होणा-या त्रासाबाबत योग्य खबरदारी घेतानाच, या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलीसही महासंचालकांच्या रडारवर राहणार आहेत. व्यापा-यांना दमदाटी करून पैसे उकळणा-याचा प्रयत्न करणा-या अधिका-यांना, तत्काळ निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, गोमांसाबाबत स्वत: व्यापा-यांवर कारवाई न करता, त्याबाबत पहिल्यांदा पोलिसांना माहिती द्यावयाची आहे. त्यांनी कायदा हातात घेतल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.कथित गोरक्षकांकडून होणा-या हल्ल्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त करीत, त्याबाबत कडक कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्याचबरोबर, गणेशोत्सव येत असल्याने, या दोन्ही उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महासंचालक माथुर व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपिन बिहारी यांनी गुरुवारी बंदोबस्ताबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये तीन राज्यांच्या सीमा भागातून जनावरांची आयात होत असल्याने, या ठिकाणच्या विविध मार्गांवर २७ तपासणी नाके बनविण्यात आले आहेत. त्याशिवाय पोलिसांनी जनावरांचा बाजार होणारे ठिकाण, अधिकृत कत्तलखाने या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमण्यात येणार असून, या ठिकाणी येणाºया जनावरांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे.