मुंबई : उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरून विरोधी पक्षांनी टीकासत्र सुरु केले असताना युतीतील मित्रपक्षानेही यामध्ये उडी घेतली आहे. आरबीआयसाठी नवीन व्यक्तीचा शोध घेण्यापेक्षा केंद्र सरकारने सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घ्याव्यात, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उर्जित पटेल यांनी आज आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा मुदतीआधीच राजीनामा दिला. यावर विरोधी पक्षांसह मनसेचे राज ठाकरे यांनीही शरसंधान साधले होते. आता शिवसेनेनेही टीका केली आहे.
उर्जित पटेल यांच्या राजीनाम्या बाबत गेले काही दिवस चर्चा सुरु होती अखेर आज तो आला. नवीन व्यक्ती शोधण्यापेक्षा सरकारने यंत्रणाच ताब्यात घ्यावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
पटेल यांच्यावर दबाव आणून त्याना राजीनामा देण्यास भाग पाडल्याने सरकारची आता उलटी गिनती सुरु झाल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.