नवी दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमीबद्दलल आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाष्य केलं आहे. त्या वादग्रस्त जागेवर मशीद असावी की राम मंदिर यावरुन विविध दावे-प्रतिदावे सुरू असताना सिसोदिया यांनी तोडगा सुचवला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एक विद्यापीठ उभारण्यात यावं, असं सिसोदिया म्हणाले आहेत. शिक्षणानंच देशात रामराज्य येईल, असंही ते म्हणाले.'त्या वादग्रस्त जागेवर भव्य मंदिर उभारल्यानं रामराज्य येणार नाही. मात्र शिक्षणानं देशात नक्कीच रामराज्य येईल. त्यामुळे दोन्ही पक्षकार सहमत असतील, तर त्या वादग्रस्त जागेवर नक्कीच एक विद्यापीठ उभारता येईल,' असा तोडगा सिसोदिया यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सुचवला. या कार्यक्रमात सिसोदिया यांना आम आदमी पार्टीची राम मंदिराबद्दलची भूमिका विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ उभारण्याची कल्पना मांडली. विद्यापीठात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि परदेशी विद्यार्थीदेखील शिक्षण घेऊ शकतील, असं ते म्हणाले. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मनीष सिसोदिया यांनी जातीय राजकारण आणि शिक्षणावर भाष्य केलं. 'आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन रामराज्य आणता येईल. या प्रकरणावर सुरू असलेलं राजकारण रोखण्याची क्षमता फक्त आणि फक्त शिक्षणात आहे,' असं सिसोदिया म्हणाले. सध्या इतर देशांमध्ये काय सुरू आहे आणि आपल्याकडे नेमकं काय चाललं आहे, याचाही विचार व्हायला हवा, असं त्यांनी म्हटलं. 'मी नुकताच जपानला गेलो होतो. तिथे ज्या दिवशी हायड्रोजनवर चालणाऱ्या कारवर चर्चा सुरू होती, त्याचवेळी आपल्याकडे हनुमानाची जात कोणती, यावर राजकारण सुरू होतं. हे खूपच निराशाजनक आहे. ही परिस्थिती केवळ शिक्षणामुळेच बदलू शकते,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'अयोध्येत मंदिर नव्हे, विद्यापीठ उभारा; नक्कीच रामराज्य येईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:55 PM