कधी, कुठे, कसं, कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता चेन्नईमध्ये घडली आहे. दोन मनोरुग्ण उपचार घेण्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये आले होते, पण ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना कळलंच नाही. दोघंही उपचारासाठी चेन्नईतील 228 वर्षे जुन्या इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या कॅम्पसमध्ये गेले होते. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या कॅम्पसमध्ये दोघांची लव्हस्टोरी फुलली. जेव्हा त्यांच्या घरच्यांना प्रेमप्रकरणाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी विरोध केला.
मेंटल हॉस्पिटलमध्येच त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, दीपा आणि पी. महेंद्रन यांना उपचारासाठी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांच्या मनाची ही अवस्था त्यांच्या कुटुंबामुळे झाली होती. कुटुंबात राहून दोघांचीही मानसिक स्थिती ढासळू लागली, शेवटी पर्याय नसल्यामुळे त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थमध्ये दाखल करण्यात आले. कौटुंबिक मालमत्तेवरून त्यांच्या नातेवाइकांमध्ये संघर्ष सुरू असताना पी. महेंद्रन यांचे आयुष्य बदललं.
कौटुंबिक कलहामुळे महेंद्रनची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळू लागली, मालमत्तेची भीती त्याला सतावू लागली आणि त्याच्या मनात चिंता सुरू झाली. त्याचवेळी दीपाच्या वडिलांचे 2016 मध्ये निधन झाले. यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, आयुष्याला वेगळ वळण मिळालं. घरात आई व बहीण असूनही तिला एकटे वाटू लागले. तिचीही मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळू लागली. मेंटल हॉस्पिटलमध्ये आल्यावर दोघांच्या देखील प्रकृतीत सुधारणा झाली. त्याच दरम्यान एकमेकांशी ओळख झाले. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. ते एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू लागले.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, दीपाने लग्नाचा कधीच विचार केला नव्हता. तर महेंद्रने आता दीपा त्याच्यासाठी सर्वस्व असल्याचं म्हटलं आहे. ह़ॉस्पिटलच्या संचालिका डॉ पूर्णा चंद्रिका यांच्या म्हणण्यानुसार, दोघं एकमेकांसोबत खूप वेळ घालवतात, अशी तक्रार माझ्याकडे आली होती. तेव्हा त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. लग्नानंतर महेंद्रन आणि दीपा इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या कॅम्पसमध्ये राहू शकत नाहीत. पण दोघेही लग्नानंतर कॅम्पसजवळ भाड्याच्या घरात राहणार असल्याचे सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.