- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) वाद शांत होण्याऐवजी आणखी चिघळत असल्याची चिन्हे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी विद्यार्थ्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. या विद्यार्थ्यांच्या अटकेवर बंदी नसल्याचे स्पष्ट करीत त्यांना पोलिसांसमक्ष शरण येण्याचे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले.जेएनयूचे विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य अशी या त्यांची नावे आहेत. जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्या पोलीस कोठडीदरम्यान न्यायालय परिसरात झालेल्या हल्ल्याचा हवाला देत, खालिद व अनिर्बन यांना थेट न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर सुनावणी प्रक्रिया कायद्यानुसार चालेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यात अटकेच्या २४ तासांत आरोपीस न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयाने आत्मसमर्पणाची जागा आणि वेळेबाबत बंद कक्षात डीसीपी आणि खालिदच्या वकिलांशी चर्चा केली. मात्र याबाबत कोणतीही सहमती झाली नाही. यानंतर न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी बुधवारपर्यंत लांबणीवर टाकली.बस्सींचे घूमजावदेशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्या जामिनासंदर्भात दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी मंगळवारी घूमजाव करताना दिसले. कन्हय्याला जामीन मिळाल्यास तपास प्रभावित होण्याचा धोका होता, असे ते म्हणाले. दिल्ली उच्च न्यायालयात दिल्ली पोलिसांनी कन्हय्याच्या जामीन याचिकेला विरोध केला. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी शहर पोलिसांना बुधवारपर्यंत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कन्हय्याच्या अटकेवेळी कन्हय्याने जामिनासाठी अर्ज केल्यास पोलीस त्यास विरोध करणार नाहीत, असे बस्सी म्हणाले होते.दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जेएनयूबाहेर तैनात केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘सेक्स व ड्रग्ज’चा अड्डाजेएनयूचा वाद पेटत असतानाच राजस्थानमधील अलवर जिल्ह्णातील रामगडचे भाजप आमदार ग्यानदेव आहुजा यांनी जेएनयू ‘सेक्स आणि ड्रग्ज’चा अड्डा बनला असल्याची टीका केली आहे. जेएनयू परिसरात रोज तीन हजार वापरलेले कंडोम, दोन हजार दारूच्या रिचवलेल्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात येणारे ५०० इंजेक्शन, १० हजार सिगारेटचे तुकडे, ४ हजार बिडीचे तुकडे मिळतात, असे ते म्हणाले.