नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर उद्या नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींच्या या कार्यकाळात त्यांच्यासमोर अनेक आव्हानांचा डोंगर असेल. देशातील जवळपास निम्म्या भागात दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: दक्षिण भारतातदुष्काळाची दाहकता जास्त असेल असा अंदाज आहे. त्यामुळे अनेक राज्यांना केंद्राच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे. बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी गांधीनगरमधील दुष्काळाची माहिती देणाऱ्या यंत्रणेनं धोक्याचा इशारा दिला आहे. देशातील 40 टक्क्यांहून अधिक भागात दुष्काळ पडू शकतो. यापैकी निम्म्या भागातील दुष्काळाची तीव्रता गंभीर असू शकेल, अशी भीती आयआयटी गांधीनगरकडून वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे दरम्यान होणाऱ्या मान्सूनपूर्व पावसात यंदा 22 टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील दोन तृतीयांश भागात कमी किंवा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी मान्सूनपूर्व पावसाची नोंद यंदा झाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 49 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागाला दुष्काळाचा जबरदस्त फटका बसू शकतो. मान्सूनपूर्व पाऊस कमी झाल्यानं ग्रामीण भागासह शहरी भागातही पाणीसंकट तीव्र होणार आहे. पाऊस कमी झाल्यानं ऊस, भाज्या, कापूस आणि फळांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च ते 15 मे च्या दरम्यान 75.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या काळात सरासरी 96.8 मिलीमीटर इतका पाऊस होतो. त्यात यंदा घट झाली आहे.
देशातील निम्म्या भागावर दुष्काळाचं संकट? मोदी सरकारसमोर मोठं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:27 PM