बंगळुरू : शितावरून भाताची परीक्षा करू नये, अशी मराठीत म्हण आहे. कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यात एका कार कंपनीच्या शाेरूममध्ये ही म्हण खरी ठरविणारी घटना उघडकीस आली आहे. एक शेतकरी पिकअप गाडी खरेदी करण्यासाठी गेला हाेता. मात्र, त्याचे कपडे घाणेरडे असल्यामुळे सेल्समनने त्याचा अपमान केला. ताे शेतकरी तासाभरात १० लाख रुपये राेख घेऊन पाेहाेचला. या घटनेने त्या सेल्समन साेबतच शाेरूममधील सर्वजण खजील झाले.
या घटनेचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केम्पेगाैडा नावाचा शेतकरी, त्याचे काका आणि काही मित्र शाेरूमध्ये गाडी खरेदी करण्यासाठी गेले हाेते. शेतकऱ्याचे घाणेरडे कपडे पाहून सेल्समनने त्याला सांगितले, की या गाडीची किंमत १० लाख रुपये आहे. तुमच्या खिशात १० रुपयेही नसतील. आपल्या दिसण्यामुळे सेल्समनने शाेरूमबाहेर काढल्याचा आराेप शेतकरी व त्याच्या मित्रांनी केला. तासाभरात पैसे आणल्यास त्याच दिवशी गाडीची डिलिव्हरी देऊ शकताे का, असे शेतकऱ्याच्या काकांनी त्या सेल्समनला विचारले. त्यावर त्याने गाडी त्याच दिवशी देण्याचे कबूलही केले. केम्पेगाैडा अर्धा तासातच १० लाख रुपये राेख घेऊन आला. मात्र, सेल्समनने शब्द फिरवल्याचा आराेप केम्पेगाैडाने केला.
पाेलिसांची मध्यस्थीयाप्रकरणी पाेलिसांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, आता या शाेरूममधून गाडी खरेदी करायची नाही, असे शेतकऱ्याने ठासून सांगितले. परंतु, माफीनाम्यासाठी ते आग्रही हाेते.