ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. १५ - छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाकडे पोलिस खात्याने अंत्यसंस्काराचा खर्च झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावरुन टीकेची झोड उठताच पोलिस खात्याने त्यांचा निर्णय मागे घेतला असला तरी शहीदांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत पोलिस खाते किती असंवेदनशील आहे हे दिसून येते.
छत्तीसगडमध्ये २०११ मध्ये नक्षलवादी हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल किशोर पांडे शहीद झाले होते. किशोर पांडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यासाठी सुमारे १० हजार रुपये खर्च करण्यात आला. पण संतापजनक बाब म्हणजे २०१४ मध्ये छत्तीसगड पोलिस मुख्यालयातून पांडे कुटुंबीयांना एक पत्र आले होते. किशोर पांडे यांच्यांवरील अंत्यसंस्कारासाठी झालेला १० हजार रुपयांचा खर्च हा पोलिस वेलफेअर फंडातून खर्च करण्यात आल्याने हे पैसे परत करावेत असे या पत्रात म्हटले होते. यात भर म्हणजे तीन दिवसांपूर्वी पोलिस मुख्यालयाने पुन्हा एकदा पांडे कुटुंबीयांना पत्र पाठवून १० हजार रुपये परत करण्याची 'आठवण' करुन दिली. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच पोलिस खात्यावर व छत्तीसगड सरकारवर टीकेची झोड उठली. शासकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराचा खर्च मागणे म्हणजे शहीदांचा अपमान आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. अखेरीस पोलिस मुख्यालयाने हे पैसे परत घेणार नसल्याचे सांगत वादावर पडदा टाकला.