ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.२९ - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा दुस-यांदा सांभाळणा-या ममता बॅनर्जींच्या शपथविधीसाठी उपस्थित असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांनी माफी मागीतली आहे. शपथविधीसोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना अब्दुल्ला फोनवर बोलत असल्याचे छायाचित्र माध्यमात प्रसिद्ध झाले होते.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, राष्ट्रगीताचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. मी राष्ट्रगीतासाठी उभा राहिलो होतो. मात्र, यामुळे कुणाची नाराजी झाली असेल तर मी माफी मागतो.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. राज्याचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी रेड रोडवर आयोजित एका समारंभात ६१ वर्षीय ममता बॅनर्जी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि द्रमुकच्या कानिमोझी यांच्यासह मोठ्या संख्येत राजकीय नेते उपस्थित होते.
या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रगीत सुरु असताना, फारुख अब्दुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, ते फोनवर बोलत असल्याचे कॅमे-यांमध्यै कैद झाले. या मुद्यावरून अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका झाली असून त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे बोलले जात होते. याप्रकरणा माफी मागून होणाऱ्या टिकेवर पडदा टाकला आहे.