नवी दिल्ली: देशाच्या प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा झालेला अपमान दुर्दैवी असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिन देशासाठी पवित्र आहे. अशा पवित्र दिनी तिरंग्याचा झालेला अपमावन दुर्भाग्यपूर्ण आहे, असं कोविंद म्हणाले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात कोरोना काळात सरकारकडून करण्यात आलेली मदत, कृषी कायद्यांना दिलेली मंजुरी, आत्मनिर्भर भारत यावर भर दिला.'देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना नवीन 3 कृषी कायद्यांचा फायदा होईल'प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा झालेला अपमान दुर्दैवी आहे. घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्याच घटनेनं आपल्याला काही कर्तव्यंदेखील सांगितली आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याची शिकवण घटनेनं दिली आहे, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च काढला. यावेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज फडकवला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी घटनेनं दिलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.विरोधक आक्रमक! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस, शिवसेनेसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार
तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. जुन्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना मिळणारे अधिकार यापुढेही कायम राहतील, ही गोष्ट माझं सरकार स्पष्ट करू इच्छितं. जुन्या व्यवस्थेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या अधिकाऱ्यांना नख लावलं जाणार नाही. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या सुविधा मिळतील. त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढेल, असं राष्ट्रपती म्हणाले.