ऑनलाइन लोकमत
सिकर, दि. 10 - राजस्थान सरकारमध्ये मंत्री असणा-या राजकुमार रिणवा यांनी शहिदांसंबंधी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे", असं राजकुमार रिणवा बोलले आहेत. राजकुमार रिणवा यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात नेत्यांचा नालायक असा उल्लेखही करुन टाकला आहे.
आणखी वाचा
राजकुमार रिणवा रविवारी सिकर जिल्ह्यामधील कोलिडा गावात शहिद केशर देव यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजकुमार रिणवा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत, काही नेत्यांना नालायक म्हणून टाकलं. शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांना खडे बोल सुनावत राजकुमार रिणवा यांनी अशी वक्तव्य करणारे नेते नालायक असतात असं सांगितलं आहे.
#WATCH: Rajasthan Minister Rajkumar Rinwa says "there should a law to chop those politicians who make statement on Army. (July 9) pic.twitter.com/0E5NZC6b9X— ANI (@ANI_news) July 10, 2017
इतकंच नाही, तर शहिदांविरोधात वक्तव्य करणा-या नेत्यांचे तुकडे केले पाहिजेत असंही यावेळी ते बोलले आहेत. "जवान 50 डिग्री ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये राहून आपल्या देशाची सुरक्षा करत असता. पण काही नेते त्यांच्याविरोधात वक्तव्य करत असतात. अशा नेत्यांचे तुकडे केले गेले पाहिजेत. यासाठी राज्यघटनेत तरतूदही असली पाहिजे. असं करणा-यांवर कोणता गुन्हा दाखल करु नका, पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे.
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
काही दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी लष्कराच्या जवानांवर गंभीर आरोप केला होता. आझम खान यांनी भारतीय जवानांवर बलात्काराचा आरोप केला होता. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते. ते बोलत होते की, "महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"".
पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.