Congress Strategy In CWC Meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे संसदेसह देशात पडसाद उमटले. इंडिया आघाडीने या मुद्दा लावून धरत संसदेत घोषणाबाजी करत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करण्यात आले. संसदेबाहेरही काँग्रेसनेअमित शाह आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा काँग्रेस लावून धरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत काँग्रेसची रणनीती ठरली असून, अमित शाह यांना लक्ष्य करत भाजपाला घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनानाल १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाच्या कार्यकारणी समितीची बैठक बेळगावला होत आहे. या बैठकीत डॉ. आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा लावून धरला जाणार आहे. तसेच त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, पक्षाचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. २७ डिसेंबरला पक्षातर्फे बेळगावमध्ये जय बापू, जय भीम, जय संविधान मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.
अमित शाह यांना हटवले पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे
अमित शहांना हटवले पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या टिप्पणीबद्दल माफी मागितली पाहिजे या मागणीचा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला राज्यघटना हटवायची आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांनी संसदेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी पायऱ्यांना वंदन केले होते. त्यानंतर जुन्या इमारतीचा त्याग करण्यात आला आणि नवीन इमारत बांधण्यात आली. यावर्षी २६ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी राज्यघटनेच्या मूळ प्रतीला वंदन केले, याचा अर्थ नवीन राज्यघटना आणली जाईल, असा दावा जयराम रमेश यांनी केला.
दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच मंदिर-मशीद वादाचे मुद्दे उपस्थित न करण्याबद्दल विधान केले होते. मात्र, त्यांचे हे विधान म्हणजे दुटप्पीपणा आहे अशी टीका जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसतर्फे हा आठवडा आंबेडकर सन्मान सप्ताह मानला जात आहे. तसेच बेळगाव येथील बैठकीत काँग्रेसकडून पुढील वर्षाचा कार्यक्रम निश्चित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.