नवी दिल्ली : आधीपासून असलेल्या रोगाचे कारण दाखवून एखाद्या व्यक्तीच्या विम्याची भरपाई विमा कंपन्यांना नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जळगावातील एका प्रकरणात दिला.
निकालात म्हटले की, एखादा विमाधारक व्यक्ती विशिष्ट आजाराने ग्रस्त असेल पण त्याची त्याला माहिती नसेल, त्या आजारावर त्याने काहीही उपचार घेतले नसतील अशा स्थितीत त्या रुग्णाच्या विम्याची भरपाईची रक्कम नाकारता येणार नाही. मधुमेहाच्या आजाराने रेखा हल्दर या महिलेचे २४ जून २०११ रोजी निधन झाले. रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने १२ जुलै २०१० रोजी त्यांची मेडिक्लेम पॉलिसी काढली होती. रेखा यांच्या निधनानंतर त्यांच्या पतीने विम्याच्या रकमेसाठी केलेला दावा कंपनीने नाकारला. रेखा यांच्या पतीने त्याविरोधात जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर रेखा यांच्या पतीस १,१२,५०० रुपये भरपाई देण्याचा आदेश मंचाने दिला. या निकालाच्या पुनर्विचारासाठी रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीने केलेला अर्ज महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगानेही फेटाळून लावला. त्यामुळे रिलायन्सने राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागितली होती.
जीवनशैलीशी निगडित आजारआयोगाने म्हटले की, विमा घेण्याआधी काही आजार होता की नव्हता हे सिद्ध करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. केवळ या कारणापायी कंपनी भरपाई नाकारू शकत नाही.