विमा असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आणि लसीकरणामुळे जर त्या व्यक्तीला काही आरोग्यासंबंधी समस्या होऊन रुग्णालयात दाखल झाली, तर त्याच्या उपचाराचा खर्च विमा कंपन्यांना आता द्यावा लागणार आहे. भारतीय विमा नियामक मंडळ आणि विकास प्राधिकरणानं हे आदेश दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीनं विमा कवच घेतलं असेल आणि त्याला लसीकरणानंतर काही समस्या आल्या, तसंच त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर विमा कंपनी त्याचा खर्च देण्यास किंवा कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यास मनाई करू शकणार नाही. IRDAI नं गुरूवारी यासंबंधी माहिती दिली. "कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर काही समस्या उद्धभवल्यास रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आरोग्य विम्यात त्याचा खर्च सामील असेल की नाही, याबाबत लोकांच्या मनात शंका असल्याचं माध्यमांमध्ये काही वृत्त प्रसारित झाल्यावरून दिसून आलं. लसीकरणानंतर काही समस्या निर्माण झाल्यास आरोग्य विम्याअंतर्गत त्याचा लाभ घेता येईल. यासाठी विमा कंपन्यांनी पहिल्यापासून जे नियम आणि अटी सांगितल्या असतील त्याचं त्यांना पालन करावं लागेल," असं IRDAI नं गुरूवारी स्पष्ट केलं.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला होता प्रश्नकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर जर काही कारणास्तव आपल्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं तर विमा कंपन्या त्याचा खर्च उचलतील का? असा सवाल काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला होता. यावर IRDAI नं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच विम्याचे सामन्य नियम आमि काही अटींनुसार ग्राहकांना क्लेम करता येईल, असंही नियामक मंडळानं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे सरकारी विमा कंपनी एलआयसीनं कोविड संकटामुळे समस्येचा सामना करत असलेल्या आपल्या ग्राहकांसाठी सेटलमेंट प्रक्रिया सोपी केली आहे. पॉलिसी मॅच्युअर झाल्याचे आणि त्याच्याशी निगडीत कागदपत्र ग्राहकांना कोणत्याही शाखेत जमा करता येणार असल्याचं एलआयसीनं म्हटलं.