नवी दिल्ली - जीवन विमा व आरोग्य विमा यांच्या हप्त्यांवर (प्रीमियम) सध्याच्या १८ टक्के वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्यावर सोमवारी जीएसटी परिषदेच्या ५४ व्या बैठकीत व्यापक सहमती झाली. यासंबंधीचा अंतिम निर्णय पुढील नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल.
कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी १२ टक्केवरून ५ टक्के तर फरसाणवरील कर १८ टक्केवरून १२ टक्के इतका केला. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेची बैठक झाली. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना आरोग्य विम्यावरील जीएसटीद्वारे ८,२६२.९४ कोटी, तर आरोग्य पुनर्विम्यावरील करापोटी १,४८४.३६ कोटी मिळाले.
आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याबाबत स्थापन केलेला मंत्रिगट आपला अहवाल ऑक्टोबर अखेरीपर्यंत सादर करेल. आरोग्य विम्यावरील जीएसटी कपातीबाबत निर्णय नोव्हेंबरच्या बैठकीत होईल. - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री