श्रीनगर: पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात मोठ्या कारवाया करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणांना याबद्दलची माहिती मिळाली असून त्यानुसार हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा भारतात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी जम्मूच्या मंदिरांमध्ये हल्ले करण्यासाठी योजना आखत आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी जम्मूतील सुरक्षा दलांना हाय अलर्ट दिला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ५ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टला जम्मूतील मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय ५ ऑगस्ट २०१९ ला घेण्यात आला. या निर्णयाला आता २ वर्ष पूर्ण होत आहेत. तर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना भारतात हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
ड्रोनच्या माध्यमातून स्फोटकं पाडून दहशतवादी संघटना हल्ले घडवून आणू शकतात. त्यामुळे सीमावर्ती भागापासून शहरापर्यंत सुरक्षा चौक्या वाढवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील भागात सुरक्षा दलांचे जवान शोध मोहीम राबवत आहेत. जैश आणि लष्करसारख्या संघटनांनी आता काश्मीरपेक्षा जास्त लक्ष्य जम्मूवर केंद्रीत केलं आहे. या भागात ड्रोनच्या माध्यमातून आयईडी पाठवून स्फोट घडवण्याचा दहशतवादी संघटनांचा कट आहे. गेल्या काही दिवसांत सीमेपलीकडून अनेकदा ड्रोन आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून आयईडी पाठवून त्यांचा स्फोट घडवून आणण्याची रणनीती सध्या दहशतवाद्यांकडून वापरली जात आहे.