- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - दहशतवाद्यांशी लढण्यासाठी मला भारतीय गुप्तचर यंत्रणांनीच बनावट पासपोर्ट दिला असल्याचा दावा गॅगस्टर छोटा राजनने न्यायालयात केला आहे. '16 वर्षापूर्वी बँकॉकमध्ये असताना दाऊद इब्राहिमपासून आपल्या जीवाला धोका असल्याने मोहन कुमार नावाने आपल्याला पासपोर्ट देण्यात आला होता,' असं छोटा राजनने सांगितलं आहे. तिहार जेलमध्ये असलेल्या छोट्या राजनने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात ही माहिती दिली आहे.
न्यायालयामध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजनचा जबाब नोंदवण्यात आला. छोटा राजन आणि तीन पासोपर्ट अधिका-यांविरोधात बनावट पासपोर्ट प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दिल्ली न्यायालयाने छोटा राजनवर बनावट पासपोर्ट प्रकरणी फसवूणक आणि गुन्हेगारी कटाचे आरोप ठेवले आहेत.
'दहशतवाद्यांशी आणि भारताविरोधी कारवाया करणा-यांशी लढा देण्या-यांमध्ये माझा सहभाग होता. मला ज्यांनी मदत केली त्यांची नाव सांगू शकत नाही,' असं छोटा राजन बोलला आहे. 25 वर्षांपासून फरार असलेल्या छोचा राजनला अखेर इंडोनेशियामध्ये अटक झाली होती.
छोटा राजनने 'मी गुप्तचर यंत्रणांना 1993 स्फोटाचा कट रचणा-यांची माहिती देत असल्याचं दाऊदच्या लोकांना कळलं होतं. त्यानंतर त्यांनी माझा पाठलाग सुरु केला होता. दाऊदच्या लोकांनी दुबईत माझा पासपोर्ट काढून घेतला,' असा दावा केला आहे. '1993 च्या स्फोटानंतर मी देशाच्या सुरक्षेसाठी काम करत होतो आणि देशाला धोका पोहोचवणा-यांशी लढत होतो. यासाठी माझी ओळख गुपित ठेवायची होती जेणेकरुन देशाची सरक्षा करणा-यांची मदत करणं सोप होणार होतं,' असंही छोटा राजनने सांगितलं आहे.