नवी दिल्ली : कोणताही विशेष प्रसंग किंवा औचित्य नसताना सातत्याने टिष्ट्वट सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी येथे मोहंमद इकलाखचा जमावाने ठेचून खून केल्याप्रकरणी भाष्य केले नाही. त्यांनी हेतुपुरस्सर मौन पाळल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि एकेकाळी मोदींचे खास समर्थक राहिलेल्या अरुण शौरी यांनी केला आहे.मोदी हे होमिओपॅथी विभागाचे गट अधिकारी किंवा विभागप्रमुख नसून देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाला नैतिक मार्ग दाखवून द्यावा, असे ते एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले. हिंसाचार आणि बीफ वादानंतर शौरींनी अलीकडे मोदींवर केलेला हा दुसरा थेट हल्ला आहे. शौरी यांनी भाजप सदस्यत्वाचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.रालोआ सरकार हे संपुआ सरकारची कॉपी असून सोबत गाय असलेली काँग्रेस आहे. बिहारमधील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी आणि पक्षनेत्यांनी हा मुद्दा धगधगत ठेवला असताना दादरीसारख्या घटनांबद्दल मोदींनी मुद्दाम मौन पाळले आहे. यापूर्वी शौरींनी केलेल्या टीकेला महत्त्व देण्याचे टाळत भाजपने शौरी हे मंत्री बनू न शकल्याने दु:ख व्यक्त करीत आहेत, असा टोला मारला होता. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारमध्ये एका समुदायाला दुसऱ्याविरुद्ध भडकावण्याचे काम चालविले आहे. पाकिस्तान खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना भारत हळूहळू त्या खड्ड्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींना २००२ च्या गुजरात दंगलींपासून वैचारिक असहिष्णुतेची सर्वात मोठी झळ पोहोचली आहे. तेच मोठे पीडित ठरले आहेत, या शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे सर्वात वाईट बचाव होय. मोदींच्या सूडबुद्धीचेच ते योग्य समर्थन ठरेल. विचारवंत हे विवेक बाळगणारे असतात. त्यांच्या उद्देशाबद्दल प्रश्न उपस्थित केला जाऊ नये, असे ते म्हणाले. मोदी तर सर्वसमावेशकपंतप्रधान मोदी हे असहिष्णू नव्हे, तर सर्वसमावेशक असे नेते आहेत, असे स्पष्ट करीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी भक्कम बचाव केला आहे. मोदी ७ नोव्हेंबर रोजी काश्मीर भेटीवर येत असून त्यावेळी ते पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करण्याला अनुकूलता दर्शवतील. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये काश्मीरच्या भूमीवरूनच पाकिस्तानसोबतच्या चर्चेची कोंडी फोडली होती, याचे स्मरणही त्यांनी करवून दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींचे दादरीवर हेतुपुरस्सर मौन
By admin | Published: November 04, 2015 4:27 AM