उत्तर प्रदेशातील देवरिया येथे शिक्षक दिनी केक कापण्यावरून कॉलेजचे प्रिन्सिपल आणि शिक्षकांमध्ये हाणामारी झाली. हा वाद इतका वाढला की तुफान राडाच पाहायला मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये शिक्षकाच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. शिक्षकाने मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे भलुअनी हद्दीतील शांती निकेतन इंटर कॉलेज टेकुआं येथे शिक्षक दिनी हा कार्यक्रम होणार होता. शिक्षक श्रीनारायण सिंह यादव यांच्यावर वर्गात केक कापल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रिन्सिपल हरिश्चंद्र यादव वर्गात पोहोचले असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ होऊन हाणामारी झाली. याच दरम्यान शिक्षक जखमी झाले.
शिक्षक श्रीनारायण सिंह यादव सांगतात की, "मुलांनी शिक्षक दिनी केक आणला होता. मुलांच्या विनंतीवरून त्यांनी केक कापला. त्याचवेळी मुख्याध्यापक वर्गात आले आणि माझ्या डोक्यात काठीने मारहाण केल्याने मी जखमी झालो. डोक्यावर दहा वेळा मारलं. वर्गातील मुलांनी मला उचललं."
प्रिन्सिपल हरिश्चंद्र यादव हे कॅमेऱ्यासमोर बोलले नाही. मात्र, कॅमेरा बंद करताना ते म्हणाले की, शिकवत असताना केक कापण्याबाबत विचारलं असता शिक्षकाने शिवीगाळ करून हात वर केले, त्यानंतर आम्ही स्वत:चा बचाव करताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते टेबलावरून खाली पडले आणि जखमी झाले.
प्रिन्सिपलने सांगितले की, एक कार्यक्रम करण्याबाबत चर्चा झाली होती, शिकवत असताना शिक्षकाने केक कापला आणि शिवीगाळ केली. दुसरीकडे, या प्रकरणाबाबत स्टेशन प्रभारी राजेश कुमार पांडे यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.