ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी व्दैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 6.25 टक्के कायम ठेवला आहे तर, रिव्हर्स रेपो रेटमध्ये वाढ करताना रिव्हर्स रेपो रेट 6 टक्के केला आहे.
2017-18 च्या पहिल्या सहा महिन्यात महागाईचा दर 4.5 टक्के आणि नंतरच्या सहा महिन्यात महागाई दर 5 टक्के राहील असा आरबीआयचा अंदाज आहे. चालू वर्षात जीडीपी विकास दर 7.4 टक्के असेल असा आरबीआयचा अंदाज आहे. 2016-17 मध्ये जीडीपीचा दर 6.7 टक्के होता.
रेपो रेट म्हणजे काय?
रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याचा व्याजदर म्हणजे रेपो रेट. तो व्याज दर कमी झाल्यास इतर बँकाही आपल्या व्याज दरात कपात करतात आणि त्याचा फायदा बँकेकडून कर्ज घेणा-या ग्राहकांना मिळतो.
रिव्हर्स रेपो रेट
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने अन्य बँकांकडून पैसे घेते तो दर. रिव्हर्स रेपो रेट वाढल्यास बँकांना फायदा होतो. पण बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होतो. आरबीआयने रिव्हर्स रेपोमध्ये 25 पाँईटची वाढ केली आहे. 5.75 टक्के असलेला रिव्हर्स रेपो रेट 6 टक्के केला आहे.