मुंबई : रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात बुधवारी धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले. सलग दुसऱ्या आढाव्यात रिझर्व्ह बँकेने स्थिती जैसे थे ठेवली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर, २0१६-१७ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत ५ टक्क्यांवर नियंत्रण ठेवायचा आहे. मध्यम काळासाठी हे उद्दिष्ट २ टक्के फेरफारासह ४ टक्क्यांचे आहे. त्यानुसार, पतधोरण समितीने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रपो दर ६.२५ टक्क्यांवर कायम राहील, तसेच रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्क्यांवर कायम राहील. पतधोरण समितीने म्हटले की, महागाईचा दर ४ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याच्या उद्दिष्टास समिती बांधील आहे. त्यानुसार, महागाईचा दर आणखी खाली येणे आवश्यक आहे. विशेषत: संवेदनक्षम असलेला महागाईचा सेवा घटक आणखी खाली येण्याची गरज आहे. त्यासाठी धोरणात्मक व्याजदर आहे त्या स्थितीत ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. नोटाबंदीचा महागाईवर काय परिणाम होतो, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. या संक्रमणाच्या काळात आपली भूमिका समावेशीपणाकडून नैसर्गिकतेकडे नेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. व्याजदर जैसे थे ठेवण्याची रिझर्व्ह बँकेची ही सलग दुसरी वेळ आहे. या आधी डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यातही रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवले होते.६.२५ टक्क्यांवर असलेला रेपो रेट आधीच सहा वर्षांच्या नीचांकावर आहे. आढाव्या आधी अनेक संस्थांनी जारी केलेल्या अंदाजात व्याजदरात कपात केली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 0.१५ टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते, असे वाटत होते.
व्याजदर ‘जैसे थे’
By admin | Published: February 09, 2017 1:43 AM