बीदर जिल्ह्यात भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, खुब्बा यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा आ. प्रभू चव्हाण यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 09:23 PM2023-05-13T21:23:26+5:302023-05-13T21:28:42+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आ. प्रभू चव्हाण चौथ्यांदा विजयी झाले आहेत.
दयानंद बिरादार
औराद बाऱ्हाळी (जि. बीदर) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आ. प्रभू चव्हाण चौथ्यांदा विजयी झाले आहेत. विजयानंतर माध्यमांशी बोलताना भाजपातील अंतर्गत वाद उफाळून आला. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री आ. प्रभू चव्हाण यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत मुंबईचे पार्सल मुंबईला पाठवू असा प्रचार आ. चव्हाण यांच्या विरोधकांकडून झाल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनविली होती. पूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांना विरोध झाला नाही. यावेळी विरोध होऊनही ९ हजार ५०० मतांनी ते विजयी झाले. विजयानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा व त्यांच्या समर्थकांनी मला पाडण्यासाठी काँग्रेसला अर्थपुरवठा केला. त्यांच्या समर्थकांनी माझ्या विरोधात जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. माझा उमेदवारी अर्ज भरताना व माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्या औराद (बा.) येथील सभेला जाणूनबुजून ते गैरहजर राहिले. खुब्बा यांनी काँग्रेस उमेदवाराला आर्थिक पुरवठा तर केलाच शिवाय त्यांच्या समर्थकांनी माझ्या विरोधात प्रचार केला असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार...
भगवंत खुब्बा यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले. त्यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले. माझा वाढता प्रभाव व लोकप्रियता त्यांना सहन होत नाही. त्यांनी २०१८ मध्येही असाच प्रकार केला होता; मात्र त्याकडे मी दुर्लक्ष केले होते. आता त्यांची ही पक्षविरोधी कृत्याची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे आ. प्रभू चव्हाण यांनी सांगितले.