ISRO Chandrayaan 3: २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने अभूतपूर्व कामगिरी करत महत्त्वाकांक्षी चंद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. इस्रोच्या या मोहिमेचे केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे कौतुक करताना चंद्रयान ३ ज्या ठिकाणी उतरले, त्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ हे नाव दिले होते. आता आंतरराष्ट्रीय संघटनेने या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयान ३ लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ म्हटले जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच चंद्रयान २ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्याला ‘तिरंगा’ म्हटले जाईल. भारताच्या प्रत्येक प्रयत्नासाठी प्रेरणा म्हणून काम करेल. कोणतेही अपयश हे कोणत्याही गोष्टीची अखेर नसते याची आठवण करून देईल. शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे. तर शक्ती ते संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्याला देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.
चंद्रयान ३ लँडिंग साइटवरच्या नावावर IAUचे शिक्कामोर्तब
चंद्रयान ३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशाच्या सात महिन्यांनी आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ म्हणजेच IAU ने पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘शिवशक्ती’ या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. IAU ने मंजूर केलेल्या ग्रहांच्या नावांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. यामध्ये प्लॅनेटरी नामांकनानुसार IAU वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टिम नामांकनाने चंद्रयान ३ च्या विक्रम लँडर जिथे उतरले, त्या लँडिंग साइटच्या ‘शिवशक्ती’ नावाला मान्यता दिलेली आहे. यानंतर आता अधिकृतरित्या जगभरात चंद्रयान ३ जिथे उतरले, त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ नावाने ओळखले जाणार आहे. त्यामुळे भारताची मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवशक्ती आणि तिंरगा पॉइंट दोन्ही नाव भारतीयच आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे. ‘शिवशक्ती’ नाव देण्यावरुन काहीही वाद नाही. यात काहीही चुकलेले नाही. चंद्रयान ३ जिथे उतरले, त्या जागेला शिवशक्ती नाव का दिले? त्याचा अर्थही पंतप्रधानांनी समजावून सांगितला, अशी प्रतिक्रिया इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यावेळी दिली होती.