नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरेबिया दौऱ्यासाठी भारतानेपाकिस्तानकडे हवाई हद्दीची परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र पाकिस्तानकडून ती नाकारण्यात आली होती. पाकिस्तानच्या या निर्णयाविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संघटनेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संघटनेने पाकिस्तानकडे हवाई हद्द परवानगी का नाकारण्यात आली याचे उत्तर मागितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी त्यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीची परवानगी मिळावी, यासाठी विनंती करण्यात आली होती. मात्र, भारताची ही विनंती फेटाळण्यात आली असल्याचे सांगितले होते. यानंतर भारताकडून हा विषय आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेकडे मांडला होता. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितल्यानंतर ती उपलब्ध करून देण्यात येते.
पाकिस्ताने याआधीही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी नाकारली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याने भारताकडून पाकिस्तानला या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी मिळण्यासाठी रितसर विनंती करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानने भारताची ही विनंती फेटाळत नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानचा हवाई मार्ग खुला करण्यास नकार दर्शविला होता.