भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूची सर्वत्र चर्चा आहे. सोमवारी तिच्या पाकिस्तान प्रवासाच्या परिस्थितीची चौकशी करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलिसांच्या विशेष शाखेला दिले. सीमापार प्रवास आणि नसरुल्लाहशी विवाह हा “आंतरराष्ट्रीय कट” होता का, हे तपासण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले. अंजूचे पाकिस्तानात ज्या प्रकारे स्वागत होत आहे आणि ती ज्या लोकांना भेटत आहे, त्यावरून तिच्या भेटीच्या स्वरुपाबद्दल शंका निर्माण झाल्याची गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.
अंजूचे वडील गया प्रसाद थॉमस हे मूळचे ग्वाल्हेरच्या बोना गावचे आहेत. लग्नानंतर ती पती अरविंदसोबत राजस्थानच्या भिवडी येथे राहत होती.
इस्लाम स्वीकारून फातिमा बनलेल्या अंजूवर नसरुल्लाहसोबत निकाह केल्यापासून पाकमधून महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. नुकतेच तेथील एका बड्या उद्योगपतीने अंजूची भेट घेत गृहनिर्माण भूखंड, ५० हजारांचा धनादेश आणि त्याच्या कंपनीत नोकरीचे आश्वासन दिले होते. अंजूने इस्लाम स्वीकारल्यामुळे अभिनंदन करण्याचा छोटा प्रयत्न असल्याचे म्हणत या उद्योगपतीने पाकमधील अन्य श्रीमंतांनीही अंजूला मदत करावी, असे आवाहन केले होते.
दरम्यान, अंजूने अरविंदला फोन करून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. यात, ती पतीला तू माझ्यासोबत काय केलंस हेदेखील सर्वांना सांग, असे म्हणत शिविगाळ करते. दोघांमध्ये जोरदार भांडण होते. मुलं माझी आहेत आणि माझ्यासोबत राहतील, असे अरिवंद म्हणतो, त्यावर मी कोणत्याही थराला जाऊ शकते, असे अंजू म्हणते.