सुरेश भटेवरा , नवी दिल्ली तमाम सरकारी महाविद्यालये व विद्यापीठांचा अभ्यासक्रम लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनणार आहे. भारत सरकारने त्यासाठी वॉशिंग्टन विद्यापीठ, गेल विद्यापीठसारख्या जगातल्या नामवंत तंत्रशिक्षण संस्थांशी करार केले आहेत. एडिनबर्ग, पेनिसिल्व्हानिया, एमआयटी केंब्रिज, बर्कले व जॉर्जिया विद्यापीठांनी विद्यापीठांचा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा करून देण्याची तयारीही दर्शवली आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत विविध प्रकल्पांच्या डिजिटल लाँचिंग प्रसंगी दिल्लीत उपरोक्त घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींनी केली.देशातील ३५ राज्ये या नव्या शैक्षणिक क्रांतीत सहभागी झाली असून, केंद्र सरकारने या उपक्रमासाठी ८ हजार कोटी रूपये दिले आहेत. देशातील तीन लाखांहून अधिक विद्यार्थी सध्या या उपक्रमाशी संलग्न असून देशातल्या सर्व विद्यापीठांतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम या प्रकल्पाद्वारे शिकवला जावा, हा सरकारचा उद्देश आहे.देशातल्या तमाम विद्यापीठांमधे एका स्पर्धेव्दारा लवकरच १0 स्टार्टअपची स्थापना केली जाईल. याखेरीज ३५ नव्या विद्यापीठांमधे (प्रत्येक राज्यातील एक) विद्यापीठास स्कील इंडिया योजनेच्या विशेष सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. भारतीय भाषांमधे विलोभनीय विविधता आहे. उच्चशिक्षणात त्याचा समावेश व्हावा आणि या भाषांच्या वैभवात नव्याने भर पडावी, यासाठी प्रत्येक राज्यात भाषांची एक मॉडेल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे असे इराणी म्हणाल्या.
विद्यापीठांत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम
By admin | Published: June 04, 2016 3:42 AM