नवी दिल्ली: भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावरील हेरगिरीच्या आरोपावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी होणार आहे. 18 ते 21 फेब्रुवारी 2019 या कालावधीत हेगमध्ये ही सुनावणी होईल. कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप केला आहे. त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे. पुढील वर्षी 18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी होईल. 18 फेब्रुवारीला सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान भारताला आपली बाजू मांडावी लागेल. तर 19 फेब्रुवारीला याच वेळेत पाकिस्तानला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. यानंतर 20 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 4.30 या कालावधीत भारताकडून, तर 21 फेब्रुवारीला याच वेळेत पाकिस्तानकडून आपापली बाजू मांडण्यात येईल. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय न्यायालयात दोन्ही देशांना दोन वेळा स्वत:ची बाजू मांडावी लागेल.
कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 8:17 PM