लखनऊ : निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी द्यावी आणि बलात्कार प्रकरणातील दोषींना सहा महिन्यांच्या आत फाशी देण्याच्या मागणीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी उपोषण सुरु केले. मात्र, त्यांची रविवारी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातच, आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. यामध्ये निर्भया प्रकरणातील दोषींना फासावर लटकवण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हटले आहे.
"निर्भया प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या चारही आरोपींना कोणत्याही महिलेकडून फाशी द्यावी, यासाठी मी तयार आहे. महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल. एक महिला फाशीही देऊ शकते, ही बाब त्यातून अधोरेखित होईल,"असे वर्तिका सिंह हिने आपल्या पत्रात म्हटले आहे. याशिवाय, माझ्या मागणीला महिला कलाकार आणि महिला खासदारांनी पाठिंबा द्यावा. त्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल, असी मला आशा आहे, असेही वर्तिका सिंह हिने पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिला जाळून ठार मारण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यावेळी महाराष्ट्राची सून आणि दिग्गज नेमबाज हीना सिधू -पंडित हिने सुद्धा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एक मागणी केली होती. देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्यावा आणि शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. शस्त्र परवाना देणे ही समस्या बनणार नाही. आम्हाला देशात प्रवास करताना, कामावर जाताना सुरक्षित वाटायला हवे. आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामूहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते, असे हीना सिधू -पंडित हिने म्हटले होते.
दरम्यान, निर्भया प्रकरणातील आरोपींना येत्या 16 डिसेंबरला, सोमवारी फासावर लटकवा, अशी मागणी त्या दुर्दैवी बलात्कार पीडितेच्या आईने शुक्रवारी केली. 16 डिसेंबर 2012च्या रात्री निर्भयावर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना काही दिवसांनी ती मरण पावली. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यातील एका आरोपीने आपल्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्या मागणीला निर्भयाच्या आईने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत मी लढा सुरूच ठेवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.