जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने 22 कोटींचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान चेहरा रिंकल फ्री करणारं इंजेक्शन घेतल्यास कोरोना रोखू शकतो अशी माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत मोठा दावा केला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात बोटॉक्स इंजेक्शन घेतलेल्या 200 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आलं. त्यापैकी फक्त 2 रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणं दिसल्याचं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखणारं बोटॉक्स इंजेक्शन हे कोरोना होण्यापासून रोखतं, असा दावा फ्रान्समधील संशोधकांनी केला आहे. फ्रान्समधील मॉन्टिपेलियर युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी हे संशोधन केलं आहे. या संशोधनाचा अहवाल स्टोमॅटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. बोटॉक्स ट्रिटमेंट (Botox Treatment) मध्ये इंजेक्शच्या माध्यमातून ज्या भागात सुरकुत्या आहेत, तिथं औषध पोहोचवलं जातं. यात टॉक्सिन (Toxin) असतं. हे टॉक्सिन स्नायू डॅमेज करणाऱ्या एसिटिलकोलीनचं शरीरात वाढणारं प्रमाण रोखतं. यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात, तसंच सुरकुत्याही कमी होतात.
रिसर्चमधून महत्त्वाचा खुलासा
कोरोना व्हायरस हा शरीरातील एसिटिलकोलीनच्या मदतीने पेशींमध्ये पसरतो. बोटॉक्स इंजेक्शन हे या रसायनाला नियंत्रणात आणतं आणि कोरोनापासून बचाव होतो, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे. बोटॉक्स इंजेक्शनवर अजून संशोधन करण्याची गरज असून, या माध्यमातून कोरोनावर किती नियंत्रण मिळवता येतं याचाही शोध घेणं आवश्यक असल्याचं फ्रेंच संशोधकांनी सांगितलं आहे. संशोधकांनी बोटॉक्स इंजेक्शनचा कोरोना रुग्णांवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी 193 लोकांवर संशोधन केलं. यात 146 महिलांचा समावेश होता. त्यांचं सरासरी वय 50 वर्ष होतं. या सर्व रुग्णांनी बोटॉक्स इंजेक्शन घेतलं होतं. या संशोधनात सामील रुग्णांचं 3 महिन्यांपर्यंत निरीक्षण करण्यात आलं.
2 रुग्णांमध्ये दिसून आली लक्षणं
कोणाला कोरोना संसर्ग झाला की नाही, याकडं विशेष लक्ष दिलं गेलं. कोणत्याही रुग्णाचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह (Positive) आला नाही. मात्र 2 रुग्णांमध्ये लक्षणं दिसून आली. अन्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नसल्याचं या संशोधनाच्या अहवाल म्हटलं आहे. 53 वर्षाची एक महिला लासव्हेगास येथे ट्रिपला जाऊन आली होती. तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली पण रिपोर्ट निगेटिव्ह होता. 70 वर्षाची एक महिला आजारी पडली पण तिची तपासणी केली गेली नाही. या संशोधनात सहभागी एकाही रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज भासली नसल्याचं संशोधनाच्या अहवालात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.