नवी दिल्ली- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी महिलेची आठवण काढली आहे. गावात स्वच्छतागृह बांधण्यासाठी शेळ्या विकणाऱ्या 106 वर्षीय कुंवर बाईंना मोदींनी सलाम केला. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या कुंवर बाई यांनी गावात स्वच्छतागृह बांधण्यासाठी आपल्या उपजीविकेचं एकमेव साधन असलेल्या शेळ्या विकल्या. 22 हजार रूपयांमध्ये 15 दिवसात गावात शौचालय बांधण्यात आलं होतं. कुंवर बाईंच्या गावातील हे पहिलं शौचालय आहे. 'स्वच्छ भारत अभियानासाठी कुंवर बाई यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या या कार्यामुळे मी प्रेरित झालो आहे.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
छत्तीसगड दौऱ्यादरम्यान कुंवर बाईंची भेट झाली त्यांचा आशिर्वाद घेण्याची संधी मिळाली. ती वेळ माझ्या आयुष्यातील आठवणीत राहणारी वेळ आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. यावर्षाच्या सुरूवातीला कुंवर बाईंचं निधन झालं. पण महात्मा गांधींचं स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास असलेल्या प्रत्येकाच्या मनात व ह्रदयात कुंवर बाईंचं स्थान कायम राहिल, असंही मोदींनी म्हंटलं.
देशभरातील महिलांना सॅल्यूट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांनी विविध क्षेत्रात जे यश मिळवले आहे त्याचा आम्हाला आभिमान आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी महिलांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.