संपूर्ण देशभरात आज जागतिक महिला दिन साजरा झाला. महिला दिनाच्यानिमित्त अनेक कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. जगभरात मोठ्या प्रमाणात अशा महिला आहेत की त्या अनेक क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व गाजवत आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्येही अशीच एक महिला असून या महिलेचे कतृत्व पाहून तुम्हाला देखील कौतुक वाटेल.
छत्तीसगडमधील दंतेवाडा हा भाग नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणून ओळखला जातो. नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यासाठी अनेक जवानांना या भागात तैनात करण्यात आले आहे. यामध्ये एक अशी महिला आहे की गर्भवती असताना देखील नक्षलवाद्यांशी दोन हात करत आहे. सुनैना पटेल असं या महिलेचं नाव असून सुनैना आठ महिन्यांची गर्भवती आहे. मात्र गर्भवती असताना देखील सुनैना यांनी सुट्टी घेण्यास नकार दिला आहे.
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या 'डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड'मध्ये 'दंतेश्वरी फायटर' म्हणून सुनैना पटेल कार्यरत आहेत. याआधी एकदा पेट्रोलिंग दरम्यान सुनैना यांना गर्भपाताला सामोरं जावं लागले होते. मात्र यानंतरही सुनैनाने आपल्या कर्तव्यावरून मागे हटण्यास नकार दिला होता. सुनैना यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी धोकायदायक असला तरीही अनेकांना प्रोत्साहन देणारा आहे.
सुनैनाला याबाबत विचारल्यावर दोन महिन्यांची गर्भवती असताना त्यांनी हे काम हातात घेतले असल्याचे सांगितले. तसेच मी गर्भवती असताना देखील वरिष्ठांकडून जी जबाबदारी मला सोपवली जाईल ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे सुनैना यांनी यावेळी सांगितले.
दंतवाडाचे एसपी अभिषेक पल्लव म्हणाले की, सुनैनाला मागे एकदा पेट्रोलिंग करतानाच गर्भपाताला सामोरे जावे लागले होते. मात्र तरीदेखील ती आपले कर्तव्य सोडण्यास तयार नसल्याचे अभिषेक पल्लव यांनी सांगितले. तसेच सुनैना यांनी अनेक महिलांना आपस्या कर्तृत्वाने प्रभावित केले आहे. त्याचप्रमाणे सुनैना यांनी कमांडरचा कारभार स्वीकारल्यानंतर सैन्यात महिला कमांडोची संख्या दुपटीने वाढली आहे, अशी माहिती देखील अभिषेक पल्लव यांनी यावेळी दिली.