International Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना संकट काळात योग हा आशेचा किरण असल्याचं म्हटलं. यासोबतच भारतानं जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) मिळून तयार केलेल्या M-Yoga App चं मोदींनी लाँचिंग केलं.
M-Yoga App च्या माध्यमातून जगभरातील लोकांना वेगवेगळ्या भाषेत योगा शिकता येणार आहे. "जगाला आता M-Yoga App ची ताकद मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षण योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतील. भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबत मिळून एक महत्वाचं पाऊल उचललं आहे", असं मोदींनी यावेळी म्हटलं.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, योगाची माहिती फ्रेंच, इंग्रजी, हिंदीसह संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. अॅप पूर्णपणे सुरक्षित असून युझरचा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. १२ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात.
"जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढले आहे. पूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही," असे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.