देहरादून: आज जगभरात चौथा योग दिन साजरा होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये योग करत आहेत. मोदी 55 हजार जणांसह योगासनं करत आहेत. पंतप्रधान मोदींसह व्यासपीठावर उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. के. के. पॉल, मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, केंद्रीय आयुष मंत्री हरक सिंह रावत उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींनी योगासनांना सुरुवात करण्याआधी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'उत्तराखंड कित्येक दशकांपासून योगविद्येचं केंद्र राहिला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या दृष्टीनं या दिवसाचं महत्त्व खूप मोठं आहे. संपूर्ण जगात आज योग दिन साजरा होत आहे. भारतीयांच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे,' असं मोदी म्हणाले. 'जेव्हा फूट पाडणाऱ्या शक्तींचं सामर्थ्य वाढतं, तेव्हा समाजाच्या घटकांमधील दरी वाढते. समाजात, आयुष्यात जेव्हा तणाव वाढतो, तेव्हा योग सर्वांना जोडतो,' असं प्रतिपादन मोदींनी केलं.
Live Updates:
- अरुणाचल प्रदेशात आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगासनं
- आयटीबीपीच्या जवानांचा तब्बल 18 हजार फूट उंचीवर योग
- आयएनएस सह्याद्रीवर योगासनं
- गेट वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांकडून योगासनांचं सादरीकरण
- मुंबईत नौदल कर्मचाऱ्यांची योगासनं
- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची मुंबईत योगासनं
- सीआयएसएफच्या जवानांची मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमध्ये योगासनं
- संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात योग दिनाचा उत्साह; शेकडो जणांनी केली योगासनं
- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनात योगासनं
- आयटीबीपीच्या जवानांकडून तब्बल 18 हजार फूट उंचीवर योगासनं
- विशाखापट्टणम येथील ईस्टर्न नेव्हल कमांडच्या कर्मचाऱ्यांची आयएनएस ज्योतीवर योगासनं
- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू मुंबईत योग करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
- पंतप्रधान मोदींकडून योगासनांचं सादरीकरण
- पंतप्रधान कार्यालयाकडून देहरादूनमधील योगदिनाचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.
- वाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांची सहकाऱ्यांच्या साथीनं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये योगासनं
- गुजरातमधील अहमदाबादमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात, मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित
- कोटामध्ये रामदेव बाबांकडून योगासनं सादर; राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित
- देशभरातील 5 हजार ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन