नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने ठरवले तर काय होऊ शकत नाही याचा अनुभव कोकणमधील १२०० लोक राहत असलेल्या दारिस्ते गावाने घेतला आहे. त्यांना चक्क ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तातडीने मिळाली.
पशुचिकित्सा महाविद्यालयातील तिसºया वर्षाची विद्यार्थिनी स्वप्नाली सुतार हिला ऑनलाईन वर्गांसाठी ब्रॉडबँड कनेक्शन मिळविण्यासाठी दारिस्ते गावात खडकाळ पृष्ठभाग तासाभरापेक्षा जास्त वेळ चढावा लागत होता. तिची ही धडपड करणारी छायाचित्रे पंतप्रधान कार्यालयापर्यंत (पीएमओ) पोहोचली. ‘‘आम्ही आमच्या घरी इंटरनेटची जोडणी घेतलेली नाही. त्यामुळे मला रोज खडकांवर जाऊन तेथील झोपडीत सकाळी सात ते सायंकाळी साडेसहापर्यंत बसावे लागायचे, असे स्वप्नाली म्हणाली. झोपडीत अभ्यास करताना स्वप्नालीचे छायाचित्र व्हायरल झाले. भाजप आमदार नितेश राणे यांनी तिला शिक्षणाचा खर्च करण्याचा मदतीचा हात दिला.स्वप्नालीची छायाचित्रे पीएमओपर्यंत पोहोचली आणि तात्काळ स्थानिक सरकारी सेवा कामाला लागल्या. भारत इंटरनेट योजनेंतर्गत ब्रॉडबँड इंटरनेट सेवा स्वप्नाली राहते त्या दारिस्ते (कणकवली तहसील) गावात आली
‘‘माझ्या पालकांना माझ्या सुरक्षेची काळजी वाटायची; परंतु वर्ग चुकवावेत, असे मला कधी वाटले नाही. जेवण मिळविण्याचाही प्रश्न होताच. त्यामुळे मी फक्त सकाळीच एकदा खाल्ले. मी घरी परतायचे तेव्हा संध्याकाळ झालेली आायची, असे स्वप्नालीने सांगितले. इंटरनेटची जोडणी पहिल्यांदा गावात ग्रामपंचायतीला दिली गेली. वाय-फायद्वारे विद्यार्थ्यांना त्याची जोडणी मिळाली. आता मला जंगलात राहण्याची गरज नाही. मी खूपच आनंदी असून पंतप्रधान कार्यालयाची आभारी आहे. आम्हाला आमच्या जागी फोटोकॉपीही मिळतील आणि इतर ऑनलाईन सेवादेखील. यामुळे आमचा खूप वेळ वाचणार आहे, असे स्वप्नाली म्हणाली.