नवी दिल्ली - जर तुमच्या दैनंदिन जीवनात इंटरनेट वापर होत असेल आणि अद्यापपर्यंत तुम्ही आधार कार्ड बनवलं नसेल, तर सर्व कामं बाजूला ठेऊन आधी आधार कार्डचे काम आटोपून घ्या. कारण इंटरनेटचा वापर करता यावा यासाठीदेखील आता आधार कार्ड असणं आवश्यक असणार आहे. देशात इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता ग्राहकांकडून त्यांच्या आधार कार्ड क्रमांक मिळाल्यानंतरच इंटरनेटची सेवा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता आपल्या सेवा पुरवण्यापूर्वी ग्राहकांकडून त्यांचा युनिक आयडेन्टिटी नंबरचा तपशील मागणार आहेत. त्यामुळे आता आधार क्रमांकाविना कोणत्याही ग्राहकाला इंटरनेट कनेक्शन आणि संबंधित अन्य सेवा मिळणार नाहीत. तर दुसरीकडे ऑनलाइन विक्री करणारी कंपनी अॅमेझॉननंही आपल्या ग्राहकांना वेबसाइटवर त्यांचा आधार कार्ड क्रमांक नोंदवण्यास सांगितले आहे. आधार क्रमांकाच्या आधारे ग्राहकांचं हरवलेल्या सामानाचा शोध घेणं सोपे होईल, असे अॅमेझॉनचं म्हणणं आहे. तर बंगळुरूमध्ये भाड्यावर कार देणा-या जूमकार कंपनीनंही ग्राहकांना बुकींग करताना आधार क्रमांक देणं सक्तीचं केले आहे.
अॅमेझॉनच्या प्रवक्त्यानं सांगितले की, ग्राहकांच्या ओळख पडताळणीसाठी अधिकृत ओखळ प्रमाणपत्राच्या पुराव्याची गरज भासते. यासाठी आम्ही ग्राहकांना सरकारमान्य ओळखपत्र वेबसाइटवर अपलोड करण्यास सांगितले आहे. सध्याच्या परिस्थितीत आधार कार्ड देशव्यापी स्वरुपात सर्वमान्य असल्यानं यास प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, आधार कार्ड विनादेखील कंपनी ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवणार असल्याचंही अॅमेझॉननं स्पष्ट केले उत्पादनं आहे.