नवी दिल्ली: इंटरपोलच्या बैठकीला (Interpole meeting) भारतात आलेल्या पाकिस्तानी (Pakistan) अधिकाऱ्याने दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचे नाव ऐकून तोंडावर बोट ठेवले. पाकिस्तानातील सर्वात मोठी तपास संस्था असलेल्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक मोहसीन बट यांना प्रश्न विचारला की, 'दाऊद आणि हाफिज सईदला भारताच्या हवाली केव्हा करणार?', यावर पाकिस्तान अधिकाऱ्याची बोलती बंद झाली.
25 वर्षानंतर भारतात महासभेचे आयोजनइंटरपोलची 90वी महासभा यावेळी भारतात होत आहे. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर 25 वर्षांनंतर याचे आयोजन करण्यात आले आहे. यात 195 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या महासभेला सुरुवात झाली, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे समारोपाचे भाषण होणार आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्याची बोलती बंदपत्रकार म्हणाला, माझा एक प्रश्न आहे. यावर मोहसीन बटने हाताने नकाराचा इशारा दिला. त्यावर पत्रकार म्हणाला, तुम्ही फक्त प्रश्न ऐका, तुम्हाला हवे असल्यास उत्तर द्या किंवा नका देऊ. भारत-पाकिस्तान संबंध पुढे जातील का? हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम भारतात मोस्ट वॉन्टेड आहेत, तुम्ही त्या दोघांना भारताच्या हवाली कधी करणार? यावर मोहसीन तोंडावर बोट ठेवून प्रश्नाकडे दुर्लक्ष करून खाली बसले.
इंटरपोल म्हणजे काय?जगभरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 1923 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. त्याची स्थापना व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे झाली. 195देश त्याचे सदस्य आहेत. प्रत्येक देशाचे सरकार त्यासाठी प्रशिक्षित पोलिस अधिकारी पाठवते. 1997 मध्ये भारतात शेवटची इंटरपोल महासभा आयोजित करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा दिल्लीत याचे आयोजन करण्यात आले आहे.