नवी दिल्ली : कुख्यात घोटाळेबाज नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. नेहल मोदीवर मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत.
बेल्जियमचा नागरिक असलेल्या नेहल मोदी याच्याविरुद्ध शुक्रवारी जागतिक अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्याच्याविरुद्ध ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली जात आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल आहे. पुरावे नष्ट करण्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. भारताच्या विनंतीनंतर त्याच्याविरुद्ध जागतिक अटक वॉरंट जारी झाले.
नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी बँकेला १४ हजार कोटी रुपयांना फसविल्याचा आरोप आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर ते देशाबाहेर पळून गेले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. नीरव मोदी ब्रिटनमध्ये तर मेहुल चोकसी अँटिग्वामध्ये आहे. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झालेली असून, त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. चोकसी याने अँटिग्वाचे नागरिकत्व मिळविले आहे. त्याच्या विरोधातही भारत सरकारने प्रत्यार्पणाचा खटला सुरू केला आहे.