मनिष गायकवाड
एकदा माझी आई कोलकात्यातून मला भेटायला मुंबईत आली होती. तेव्हा ती म्हणाली, अरे कॉम्प्युटरवर इतक्या लोकांचे फोटो येतात मग तू माझा का फोटो टाकलेला नाहीस अजून? तिचा फोटो टाकायला मला लाज वाटली असावी असं तिला वाटलं होतं. पण मी इंटरनेट, सोशल मीडियावर फोटो टाकण्याच्या बाजूने कधी नव्हतोच. इतकंच काय मी माझेही फोटो फारसे कधी त्यावर टाकले नव्हते. त्यामुळे तो संवाद तिथेच संपला.
फोटोचा विचार आला की माझ्या आईचा मला एक लक्षात राहिलेला फोटो आठवतो. खरंतर तिचे फारच कमी फोटो आहेत. तो फोटो आहे तिच्या लग्नातला. कदाचित तिच्या आयुष्यातला पहिला फोटो तेव्हाच काढला गेला. अगदी लहानपणीच तिचं लग्न करुन टाकलेलं. आपण आता विवाहित आहोत हेसुद्धा तिच्या गावी नसावं.
त्या फोटोकडं पाहिलं, की तिचं लग्नाच्या वेळेस १० वर्षांपेक्षा वय कमी असावं असं दिसतं. तिच्याशेजारी एक तरणाबांड माणूस उभा आहे. तो फोटो एका स्टुडिओत काढला आहे. आता विवाह झाल्याचा पुरावा म्हणून हा एक फोटो पुरेसा आहे. पण खरं पाहायला गेलं तर अशा प्रकारचं लग्न कायद्याच्यादृष्टीने गुन्हा आहे हे सिद्ध करण्यासाठीसुद्धा हा फोटो वापरला जाऊ शकतो. फोटोत आईच्या कपाळावर, डोक्यातल्या भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र दिसतंय पण तिच्या डोळ्यात असलेलं एक प्रकारचं रितेपण लगेच जाणवतं. माझ्याबरोबर हे सगळं काय चाललं आहे हे ती विचारू शकत नव्हती आणि ते विचारणं शक्य असतं तरी ते विचारायला तिच्या आसपास जवळचं असं कोणीच नव्हतं.
माझ्या आईचा जन्म कंजारभाट समाजात झाला होता. पुण्यात या समाजात आजही मुलगी हेच सर्व समस्यांचं मूळ मानलं जातं. त्यात माझ्या आईचा जन्म खायला अन्न कमी आणि मुली जास्त अशा कुटुंबात झाला होता. केवळ मुलगा होईल या आशेमुळे घरात एका पाठोपाठ एक मुलीचा जन्म झाला. माझी आजी तर मुली जन्माला घालणारी एक यंत्र झाली होती, त्यातून तिला उसंत घ्यायलाही परवानगी नव्हती.
याचा परिणाम घरावर होणार होताच. खाणारी तोंडं जास्त झाल्यावर सरळ मुलींची लग्न लावून दिली गेली. माझ्या आईचा बनडा (समाजाच्या भाषेत नवरदेव) आग्र्याचा होता. आग्र्यला गेल्यावर ताजमहाल पाहणं दूर राहिलं माझ्या आईला सूर्यदर्शनही कठिण झालं. तिला फक्त घरातलं काम लावण्यासाठीच लग्न करण्यात आलं होतं. तिचा भरपूर छळ झाला, सर्वप्रकारे तिला राबवून घेण्यात आलं त्याबद्दल जास्त न सांगितलेलंच चांगलं.
आग्र्यामध्ये आई वयात आल्यावर तिला लगेच कोलकात्यात एका कुंटणखान्यात पाठवलं गेलं. आग्र्याच्या अंधाºया आ़युष्यानंतर कोलकात्याच्या कुंटणखान्याच्या रंगिबेरंगी गल्ल्या तिच्या नशिबी आल्या. आपला नवरा आणि सासूचा लहान मुलींना सोनागाछीमध्ये विकण्याचा धंदा आहे हे तिला कुंटणखान्यात गेल्यावर समजलं. मुजरा करता यावा म्हणून आईला तिथेच गाणं, नाचणं शिकवण्यात आलं.
आईनं ते सगळं स्वीकारलं. तिच्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हताच. तोपर्यंत तिनं कधी चार अक्षरं लिहिली नव्हती की वाचली नव्हती. बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे पळून जाण्याचा आणि दुसºया मार्गाने पोट भरण्याचा प्रश्नच नव्हता. कंजारभाट समाज तिला पुन्हा सन्मानाने जगण्याचा दुसरा मार्ग देणार नव्हताच आणि तिला स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही मिळणार नव्हते.
पण असं सगळं असलं तरी कुंटणखान्यात राहूनही तिनं स्वत:चे निर्णय स्वत: घेतले. आपल्या कुटुंबाला तिनं कुंटणखान्यापासून दूर ठेवलं. लहान बहिणींना शिकवलं, त्यांच्या विवाहाचा खर्च उचलून त्यांना कुंटणखान्यापासून दूर ठेवलं. या सगळ््या बहिणींच्या जन्मानंतर एका भावाचाही जन्म झाला होता. त्यालाही तिनं शिकवलं, त्याचं लग्न करुन त्याला संसार थाटून दिला. ज्या सुखांपासून ती वंचित राहिली होती ती सगळी सुखं, आनंद तिनं आपल्या भावंडांना मिळवून दिला. कदाचित ही सुखं तिला मिळाली नव्हती म्हणूनच तिला त्यांचं महत्त्व जास्त जाणवलं असावं.
१९८० च्या दशकामध्ये आम्ही कोलकात्याच्या बोबजार भागामध्ये आणि मुंबईत काँग्रेस हाऊसजवळच्या कोठ्यात राहायचो. तेव्हा कोठ्यांमध्ये गझल गायल्या जायच्या, तिथलं कथ्थक तर प्रसिद्ध होतं. कधीकधी गुंड-मवालीसुद्धा एकदम सभ्यपणे वागायचे. यासगळ््या वातावरणाला अत्यंत घाणेरडं समजलं जायचं, आजही मानलं जातं. पण मला त्यात कधीच वाईट वाटलं नाही कारण त्याशिवाय दुसरं काही मी पाहिलंच नव्हतं. ज्याला चांगलं वातावरण म्हटलं जातं ते मी पाहिलं नसल्यामुळे मी राहात असलेलं वातावरणं मला चांगलंच वाटायचं. मला आईनं शिक्षणासाठी दार्जिलिंगच्या एका मोठ्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. तिथे मला स्वत:ला समजून घेता आलं आणि मग हळूहळू जगसुद्धा समजत गेलं.
खरं सांगायचं झालं तर घरात ते सारखं तबला, बाजा, घुंगरू पाहून, ऐकून मलाही नाचावसं, गावसं वाटायचं. पण आईने मला एक चांगला माणूस बनवायचं ठरवलं होतं. पण तसा मी शिक्षणात यथातथाच होतोच. मार्क्सही काही फार पडायचे नाहीत. पण मी इंग्रजी शिकलो. फटाफट इंग्रजी बोलायला लागलो. मला आता लिहायची आवड आहे. लहानपणापासून आपण स्वत: लिहिलेलं पुस्तक असावं असं मला वाटायचं.
आता ती इच्छा पूर्ण झाली होती. मी काही वर्ष इंग्रजी वर्तमानपत्रांसाठी वार्ताहर म्हणून काम केलं. पुढच्याच महिन्यात माझी लीन डेज नावाने ट्रॅव्हल फिक्शन प्रसिद्ध होणार आहे. हे सगळं शक्य झालं कारण माझ्या आईनं मला बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं. तिथं माझी फर्स्ट लँग्वेज इंग्रजीच होती. इंग्रजीमुळे आपल्या भावना जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवता येतात, त्यामुळे आईचा फोटो इंटरनेटवर जाणंही माझ्यासाठी आज शक्य झालंय. कुंटणखान्यानं घातलेली बंधनं आईने तोडून मला शिकवायचं, मोठं करायचं ठरवलं. सर्वार्थानं एका समर्पणाच्या भावनेनं तिला मोठं केलं.
माझी आई आणि मला दोघांनाही मराठी येत नाही. पण लोकमतच्या लेखामुळं मी तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या भावना पोहोचवू शकत आहे. आपण कोणती भाषा बोलतो हे महत्त्वाचं नाही. ''कहाँनिया हम सबकी मिलजुलके एक जैसी ही होती है, फर्क सिर्फ समजने मै होता है, फर्क सिर्फ इन्सानियत मे होता है...''
(मनिष सध्या मुक्त पत्रकार असून तो विविध विषयांवर लिहितो, 'एकोज फ्रॉम ब्रोथेल' या नावाने त्याच्या कविता इंटरनेटवर प्रसिद्ध झाल्या आहेत.)
इन्तिसाब- समर्पण भाव
अनुवाद- ओंकार करंबेळकर