नवी दिल्ली : राज्यसभेत असहिष्णुतेच्या मुद्यावर विरोधकांनी सत्ताधारी आघाडीवर जोरदार हल्ले चढवत काही केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या चिथावणीखोर विधानांना तीव्र आक्षेप घेतला.‘राज्यघटनेसंबंधी कटिबद्धता’ या विशेष चर्चेत सहभागी होताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी संसदेतील खोळंब्याचा मुद्दा उपस्थित करताना अरुण जेटली हे ‘काऊबॉय कॉन्स्टिट्युशनॅलिझम’ अवलंबत असल्याचा आरोप केला. त्यांनी डाव्या पक्षांनाही धारेवर धरले. डाव्या पक्षांचे नेते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले नव्हते त्यामुळे त्यांना त्याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक आयोग रद्द केल्याबद्दल जेटलींनी निवडून न आलेल्यांची जुलूमशाही खपवून घेतली जाऊ शकत नाही, असे विधान केले होते. त्यावर निवडून आलेले सदस्य निवडून न आलेल्यांवर वर्चस्व गाजवणार काय? असा सवाल डेरेक यांनी केला. सभागृहाचे नेते असलेल्या जेटलींनी संसदेबाहेर अशी विधाने करीत सभागृहाची प्रतिष्ठा कमी केली आहे, असेही ते म्हणाले.भारतीय मुस्लिम पाकिस्तानात जाणार नाहीत. आमच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला हक्क बहाल केले असून त्यावर घाला घातला जाऊ शकत नाही, असे जेडीयूचे के. सी. त्यागी यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
असहिष्णुतेवर सरकारला घेरले
By admin | Published: December 02, 2015 3:57 AM