हरयाणा - पंजाबनंतर आता हरयाणातही नशील्या पदार्थांचा बाजार एकदम तेजीत असल्याचं दिसून येत आहे. ड्रग्सचे सेवन देशातील तरुण पिढी उध्वस्त करताना दिसत आहे. हरयाणाच्या यमुनानगर येथील केवळ तरुणच नाहीत, तर तरुणीही ड्रग्स आणि नशिल्या पदार्थ्यांच्या आहारी गेल्याचं दिसून येत आहे. एक दिवसापूर्वीच एक अॅक्टीव्हा चोरी गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या चोराचा उलगडा झाला आहे.
पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरुन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये, एक बेधुंद अवस्थेतील तरुणी चक्क अॅक्टीव्हा गाडी चोरताना दिसत आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीला अटक करुन न्यायालयात हजर केले आहे. अॅक्टीव्हा चोरीप्रकरणी अटक केलेली तरुणी नैंसी स्पेक नावाच्या नशिल्या द्रव्याचं सेवन करते. विशेष म्हणजे या पदार्थाची पूर्ती करण्यासाठीच तिने अॅक्टीव्हा चोरली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली असून जुन्या मंडीजवळून ही अॅक्टीव्हा चोरुन नेण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानतंर तात्काळा अॅक्टीव्हीसहीत तरुणीला अटक केली. दरम्यान, ही तरुणी 12 पास असून एका चांगल्या कुटुंबातून येते. सुरुवातीली या तरुणीला मोफत नशिली पदार्थ पुरविण्यात आले होते. मात्र, आता याच नशिली पदार्थांसाठी तिची चोरी करण्यापर्यंत मजल गेल्याचं दिसून येत आहे.