काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कलह; नाराज नेत्यांकडून उघडपणे पंतप्रधान मोदींचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 02:17 PM2022-09-04T14:17:29+5:302022-09-04T14:17:42+5:30
काँग्रेसच्या नाराज नेत्यांसोबत पक्ष हायकमांडच्या बैठकीचा सिलसिला सुरु आहे. परंतु त्याचा काही ठोस परिणाम होताना दिसत नाही
नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये सातत्याने नाराज नेत्यांचे प्रमाण वाढत चाललं आहे. असंतुष्ट नेत्यांची नाराजी दूर करण्याचे नेतृत्वाकडून प्रयत्न सुरु आहेत. गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता काँग्रेस नेता राज बब्बर यांनी उघडपणे पंतप्रधान मोदींचं कौतुक केले आहे. काँग्रेसमधील बहुतांश नेते सध्या पक्षात नाराज आहेत. त्यामुळे अनेकजण बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे.
काँग्रेस नेता राज बब्बर यांनी भाजपा सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेचं कौतुक करत ट्विटमध्ये लिहिलंय की, पंतप्रधान जन धन योजनेचे ८ वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांपर्यंत पैसे आणि मदतीविना पोहचलेली ही क्रांती आहे. यात सर्वाधिक खातेधारक महिला आहेत. अशीच योजना आपका पैसा आपके हाथ नावावर मनमोहन सरकारनं सुरू केली होती सध्याचं सरकारनं खूप चांगले काम केले आहे असं त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या नाराज नेत्यांसोबत पक्ष हायकमांडच्या बैठकीचा सिलसिला सुरु आहे. परंतु त्याचा काही ठोस परिणाम होताना दिसत नाही. आता नेते विना दहशत मोदी सरकारचं उघडपणे कौतुक करत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून वाद शमण्याची चिन्हे नाहीत. आता पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडल्यानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. विविध माध्यमातून काँग्रेस नेते त्यांची नाराजी बोलून दाखवत आहेत.
आझादांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला धक्का
आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहरलाल शर्मा यांच्यासह काँग्रेसचे ५१ मोठे नेते लवकरच राजीनाम्याची घोषणा करणार आहेत.