नवी दिल्लीः एखादी माहिती हवी असली की आपण जसं हक्काने गुगलवर जातो, तसंच एखादी वस्तू हवी असल्यावर आपण 'ए अॅमेझॉनवाले' होतो. अॅमेझॉन डॉट कॉमवरून आज आपल्याला हवी ती वस्तू घरबसल्या मागवता येते. पण हे ऑनलाइन विश्व ज्यानं साकारलं, तो जेफ बेजोस नावाचा अवलिया आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी घर, शहर, नोकरी आणि सगळं वैभव सोडून दूरच्या गावी निघून गेला होता.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, असं बिरूद मिरवणारे अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस हे आज सहकुटुंब औरंगाबादला आले होते. वेरुळमधील कलावैभव त्यांनी अनुभवलं. त्याचा आनंद, प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती.
जेफ बोजेस यांचा प्रेरणादायी प्रवास12 जानेवारी 1964 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या जेफ यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. जेफ यांच्या आईचं नाव जॅकी गेज जॉर्जसन, तर वडिलांचं नाव टेड जॉर्जसन आहे. जेफचे वडिल शिकागोमध्ये वास्तव्याला होते. तिथं त्यांचं दुचाकीचं दुकान होतं. जेफच्या जन्मावेळी त्याची आई फक्त सतरा वर्षांची होती. जेफच्या आई-वडिलांचा संसार फार काळ टिकला नाही. वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. जेफच्या आईनं घटस्फोटानंतर क्युबामध्ये राहणाऱ्या मिगुअल बेजोस यांच्याशी लग्न केलं. आई आणि बाबा लहानपणीच विभक्त झाल्यानं जेफ यांच्याकडे जन्मदात्या पित्याच्या फारशा आठवणी नाहीत.जेफ यांचं चौथी ते सहावीपर्यंतच शिक्षण ह्युस्टनमधल्या रिव्हर ओक्स एलिमेंट्रीमध्ये झालं. त्यानंतरच शालेय शिक्षण त्यांनी फ्लोरिडतल्या मियामी पेलमेंटो हायस्कूलमध्ये घेतलं. फ्लोरिडातल्याच महाविद्यालयातून त्यांनी स्टुडंट सायन्सचं प्रशिक्षण पूर्ण केलं. याठिकाणी त्यांचा सिल्वर नाईटनं गौरव झाला. 1986 मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरींगमध्ये पदवी घेतली. 1992 मध्ये मॅनहटनमधल्या डी. ई. शॉ साठी काम करताना जेफ यांची भेट मॅक्केनजी ट्टेल यांच्याशी झाली. मॅक्केनजी त्यावेळी याच संस्थेत रिसर्च असोशिएट होत्या. दोघे 1994 मध्ये विवाह बंधनात अडकले. त्यानंतर दोघे देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सिएटल शहरात गेले. याच ठिकाणी जेफ यांनी अॅमेझॉनची सुरुवात केली. जेफ आणि मॅक्केनजी यांना चार मुलं आहेत. पत्नी, तीन मुलं आणि एक मुलगी असं जेफ यांचं षटकोनी कुटुंब आहे. विशेष म्हणजे जेफ आणि मॅक्केनजी यांनी मुलीला दत्तक घेतलं आहे.