जमशेदपूर : भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रांसोबत टीव्ही डिबेटमध्ये जुगलबंदी करणाऱ्या काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजवर काँग्रेसची बाजू घेऊन बोलणाऱ्या वल्लभ यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या राजीनाम्यात काँग्रेसचेच वाभाडे काढले आहेत. असे का घडले, वल्लभ हे काँग्रेसमध्ये काय अपेक्षा ठेवून आले होते? त्यांचा मोहभंग का झाला...
खर्गेंना लिहिलेल्या पत्रात, काँग्रेस पक्ष आज ज्या प्रकारे दिशाहीन होऊन पुढे जात आहे. यामुळे मला पक्षामध्ये चांगले वातावरण वाटत नाहीय. मी सकाळ संध्याकाळी सनातन विरोधी नारेबाजी करू शकत नाही तसेच देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे वल्लभ यांनी म्हटले आहे.
गौरव वल्लभ यांनी 2019 मध्ये झारखंडमधील जमशेदपूर पूर्व येथून पहिल्यांदा निवडणूक लढवली. वल्लभ यांना 18 हजारांहून अधिक मते मिळाली आणि ते तत्कालीन सीएम रघुबर दास आणि सरयू रॉय यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होते. यानंतर 2023 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उदयपूरमधून निवडणूक लढवली होती. वल्लभ यांचा भाजपच्या ताराचंद जैन यांच्याकडून 32 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. गौरव वल्लभ हे अर्थशास्त्रातील उत्तम तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापकही राहिले आहेत. त्यांनी एका डिबेटमध्ये भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना विचारले होते की एक ट्रिलियनमध्ये किती शून्य आहेत, याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. जेव्हा पात्रा यांनी हा प्रश्न वारंवार टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा वल्लभ यांनी 5 ट्रिलियनमध्ये 12 शून्य असतात, असे सांगितले होते.
सत्य लपविणे हा गुन्हा आहे. मला अशा गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय, अशा शब्दांत वल्लभ यांनी काँग्रेसमध्ये चाललेल्या गोष्टींवर भाष्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत काँग्रेसने घेतलेल्या पक्षाच्या भुमिकेने मला स्तब्ध केले होते. मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक. पक्षाच्या या भुमिकेने मला अस्वस्थ केले. पक्षाचे आघाडीचे नेते नेहमीच सनातन विरोधी बरळत असतात. त्यावर पक्षाने मौन बाळगणे म्हणजे त्यांच्या जाचक गोष्टींना अनुमोदन दिल्यासारखे आहे. एकीकडे जातीय जनगणनेवर बोलतो तर दुसरीकडे दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाला विरोध करताना दिसतो. यामुळे पक्ष विशिष्ट धर्माचा समर्थक असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जात आहे. हे काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असे वल्लभ यांनी म्हटले आहे.
सध्या आर्थिक बाबींवर काँग्रेसची भूमिका नेहमीच देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांना अपमानित करण्याची आणि त्यांचा गैरवापर करण्याची, त्यांना शिव्या देण्याची राहिली आहे. आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या विरोधात आपण झालो आहोत. यावर तर जगाने देशाला महत्व दिले आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी देशहितासाठी पक्षाची आर्थिक धोरणे आमच्या जाहीरनाम्यातून आणि इतर ठिकाणी चांगल्या पद्धतीने मांडता आली असती, असे मला वाटत होते. म्हणून मी पक्षात आलो. माझ्यासारख्या जाणकाराला हे करता येऊ शकत नाही हे गुदमरल्यापेक्षा कमी नाही, अशी टीका वल्लभ यांनी केली आहे.