ऑनलाइन लोकमत
हिसार, दि. २६ - २०१२ मधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी राज ठाकरेंविरोधात दाखल झालेल्या देशद्रोहाच्या आरोपांची चौकशी करा असे आदेश हरियाणातील न्यायालयाने स्थानिक पोलिसांना दिले आहेत. राज ठाकरेंविरोधातील एफआयआर रद्द करण्याची स्थानिक पोलिसांची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईतील एका सभेत उत्तर भारतीयांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकऱणी हरियाणातील हिसार येथे वकिल रजत कलसन यांनी तक्रार दाखल केली होती. राज ठाकरे यांनी जातीय तेढ निर्माण करत दंगल भडकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशाची एकता दुभंगली जाण्याची शक्यता आहे असे तक्रारदारांचे म्हणणे होते. याप्रकरणी हिसार कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली होती. मात्र राज ठाकरेंचे भाषण मुंबईत झाले असून हे आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे, त्यामुळे ही एफआयआर रद्द करावी अशी भूमिका पोलिसांनी कोर्टासमोर मांडली होती. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्या. सुदेशकुमार शर्मा यांनी हरियाणा पोलिसांची मागणी फेटाळून लावत या आरोपांची चौकशी करा असे निर्देश दिले. अधिकार क्षेत्राचे कारण देत पोलिस एफआयआर रद्द करु शकत नाही असे खडेबोलही न्यायालयाने सुनावले आहेत.