नवी दिल्ली : २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा जाबजबाब घ्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे. पंतप्रधानांच्या सहमतीनेच हा निर्णय झाल्याचे माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी न्यायालयात सांगितले आहे, त्यामुळे त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे, असे या पक्षाने स्पष्ट केले.
राजा यांनी न्यायालयात दिलेली कबुली धक्कादायक आहे. पंतप्रधानही या घोटाळ्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून तपास अद्याप पूर्ण न झाल्याचे पाहता सीबीआयने पंतप्रधानांचा जाबजबाब घ्यावा, असे भाजपाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले. २ जी प्रकरणी प्रत्येक निर्णय पंतप्रधानांच्या सहमतीनेच घेतल्याचे राजा यांनी सीबीआय न्यायालयात उघड केले. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या मुद्यावर देशाला उत्तर देण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर येते. संपुआ सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.