दविंदर सिंग प्रकरणाची ६ महिन्यांत चौकशी करा; पुलवामा हल्ल्याचाही फेरतपास हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:39 AM2020-01-18T05:39:35+5:302020-01-18T05:39:52+5:30
दविंदर सिंग पुलवामा जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक होते. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह पकडले गेलेले पोलीस उपअधीक्षक दविंदर सिंग यांच्या प्रकरणाची सहा महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करा अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. दविंदर सिंग यांना गप्प करण्यासाठी आणि ते प्रकरण दाबून टाकण्यासाठीच त्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचाही फेरतपास करावा. हा हल्ला झाला त्यावेळी दविंदर सिंग पुलवामा जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक होते. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणाबाबत मोदी सरकारने बाळगलेले मौन संशयास्पद आहे. दविंदरसिंग यांच्या अटकेनंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरे दिली पाहिजेत असेही काँग्रेसने म्हटले आहे. दविंदर सिंग यांना गप्प करण्यासाठीच त्यांच्या प्रकरणाची चौकशी एनआयएचे प्रमुख योगेशचंदर मोदी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एनआयएच्या प्रमुखांचा ‘दुसरे मोदी' असा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगली तसेच गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांचे हत्या प्रकरण यांचा तपास योगेशचंदर मोदी यांनीच केला होता.
इतके आरडीएक्स आले कुठून?
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी सांगितले की, दविंदर सिंग हे काही साधेसुधे पोलीस अधिकारी नव्हते. जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या विदेशी राजदूतांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांचा सहभाग होता. पुलवामा हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलेले आरडीएक्स नेमके कुठून आले होते, या प्रश्नाचेही उत्तर मिळायला हवे. दविंदरसिंग यांचे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने तपास व्हायला हवा.