नवी दिल्ली : फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणाची विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशी कुमार यांनी ही याचिका केली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी वरिष्ठ वकील कपिल सिबल यांनी या याचिकेबद्दल केलेल्या निवेदनाची नोंद घेतली. फोन टॅपिंग विषयाच्या व्यापक गुंतागुंत वाढवणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर ही याचिका तातडीने सुनावणीस घेणे गरजेचे असल्याचे सिबल निवेदनात म्हणाले होते. फोन टॅपिंगमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होतो, असे एन. राम आणि शशी कुमार यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने म्हटले. विरोधी पक्ष नेते, पत्रकार एवढेच काय न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवले गेले, असे हा वकील म्हणाला. फोन टॅपिंगमुळे भारतात आणि जगात खळबळ निर्माण झाली आहे, असे सिबल म्हणाले. पुढील आठवड्यात याचिका सुनावणीस घेऊ, असे न्या. रामणा म्हणाले.
फोन टॅपिंगची चौकशी करा; याचिकेवर सुनावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 7:43 AM